पनीरची बर्फी ( Paneer burfi )

साहित्य – १०० ग्रॅम पनीर , १ वाटी मिल्क पावडर ,अर्धा वाटी पिठीसाखर .

कृती – पनीर किसून , सर्व एकत्र करून मळावे .
ताटलीला/भांड्याला तुपाचा हात लावून १० मिनिटे (ढोकळ्या प्रमाणे ) उकडणे .
कुकरमध्ये किंवा मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात वरील ताटली/भांडे ठेवून वर झाकण ठेवून उकडणे .

तीळ साखर वड्या ( Seasum toffee )

साहित्य – १ छोटी वाटी साखर , १ चमचा तूप , १ छोटी वाटी तीळ, वेलदोडा पूड.

कृती – साखर व तूप कढईत गरम करावे . साखर पूर्ण विरघळून पातळ झाल्यावर कढई खाली उतरवून त्यात तीळ व वेलदोडा पूड मिसळणे.
लगेच ते मिश्रण काढून पोळपाटावर किंवा ताटाच्या मागच्या बाजूला तूप लावून लाटण्याने पातळ पोळी लाटावी.
ताबडतोब वड्या कापाव्या व काढून ठेवाव्या. (लवकर घट्ट होते म्हणून घाई करावी)

आल्याच्या वड्या (Ginger toffee )

साहित्य – १०० ग्रॅम आलं ,२ वाट्या साखर , १ वाटी दूध , अर्धा वाटी मिल्क पावडर .

कृती — आलं किसून दूध घालून मिक्सर मधून काढणे
मग सर्व एकत्र करून गॅस वर ठेवणे.
सतत ढवळत रहाणे .
पुरेसे घट्ट झाल्यावर उतरवून तूप लावलेल्या ट्रे मध्ये थापणे .

तिळाच्या वड्या ( Seasum toffee )

साहित्य – ४ वाट्या भाजलेल्या तिळाचे कूट ,२ वाट्या गूळ बारीक करून , अर्धी वाटी दाण्याचे कूट, १ टेबलस्पून तूप , अर्ध चमचा सोडा ,वेलदोडा पूड , आवडत असल्यास किसलेले सुके खोबरे.

कृती – पातेल्यात गूळ घेऊन अर्धी/पाऊण वाटी पाणी , १ टेबलस्पून तूप याचा पक्का पाक करावा.
खाली उतरवून पाव ते अर्धा चमचा सोडा घालावा , हलवावे , पाक फसफसून येतो.

त्यात कूट व वेलदोडा पूड घालून ढवळावे . (सोडा नसेल तरी चालेल )
ट्रे किंवा ताटाला तूप लावून सर्व मिश्रण त्यावर थापावे. थापण्यासाठी प्लास्टिकला तूप लावून त्याने थापावे.

नानकटाई (Nankatai , cookies )

साहित्य – १ वाटी तूप ,१ वाटी पिठीसाखर , २ वाट्या मैदा ,जायफळ व वेलदोडा पूड

कृती – तूप साखर एकत्र करून फेटून घेणे .
त्यात अर्धा चहाचा चमचा सोडा ,वेलदोड्याची पूड,जायफळ व मैदा मिसळून थापावे.
ओव्हन मध्ये भाजण्यास ठेवावे . वेळ २० ते २५ मिनिटे .