सांबार – Sambar

साहित्य

तूर डाळ (मूग /मसूरही  वापरू शकतो ), सांबार मसाला , कांदा, बटाटा , चिंच ,

फोडणीचे साहित्य, १,२ चमचे  उडीद डाळ , लाल मिरची , कढीलिंब .

कृति 

कुकरमध्ये डाळीच्या भांड्यात साली काढून  चौकोनी फोडी केलेला बटाटा , कांदा व सांबार मसाला घालून शिजवून घ्यावे.

यात भोपळा,भोंडी मिरची ,शेवग्याच्या शेंगा अशा इतरही भाज्या आपण घालू शकतो

१, २ चहाचे चमचे उडीद डाळ धुवून ठेवावी.

चिंच भिजवून ठेवावी . घालण्या अगोदर कोळून ( पाण्यात नीट विरघळवून ) व नंतर गाळून ते पाणी घ्यावे .

नेहमीप्रमाणे फोडणी करून नंतर त्यात कढीलिंब,लाल मिरची (नसली तर हिरवी मिरची ) , उडीद डाळ

व त्यावर वरीलप्रमाणे शिजवून घेतलेले  डाळीचे मिश्रण  आणि चिंचेचे पाणी घालावे.

शिजवताना कांदे,बटाटे , सांबार मसाला घातला नसल्यास नंतर फोडणीत कांदे , बटाटे परतून घ्यावे.

 

 

चिंचगुळाची आमटी – Chinchgul Aamti

साहित्य

तूर/मूग/मसूर  एकत्र किंवा एका वेळी एखादी डाळ , चिंच , गूळ , गोडा  मसाला ,

तिखट,मीठ , कढीलिंब , मिरची , ओले खोबरे , कोथिंबीर

कृति 

कुकरमध्ये वरण शिजवून घ्यावे.

तुरीच्या ऐवजी आपण मुग,मसूर डाळीही  वापरू शकतो.

चिंच भिजवून ठेवावी. व करण्याआधी कोळून (पाण्यात नीट विरघळवून)  पाणी गाळून घ्यावे.

शिजलेल्या वरणात चिंचेचे पाणी , गूळ ,  गोडा मसाला , तिखट , मीठ  घालावे.

नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यावर कढीलिंब, मिरची व वरील तयार केलेले वरण घालावे.

उकळताना  ओले खोबरे  (असल्यास )  व  कोथिंबीर घालावी.

 

पातळ पिठले – Liquid Pithale

साहित्य

हरभरा डाळीचे पीठ , कढीलिंब, मिरची, लसूण  , तिखट ,मीठ, पाणी, कोथिंबीर

फोडणीचे साहित्य व असल्यास १,२ आमसुले .

कृति 

तेल गरम करून त्यावर मोहोरी, हिंग, हळद, कढीलिंब ,मिरची, लसूण सोलून व बारीक तुकडे करून घालणे.

त्यावर २ कप पाणी ओतावे . त्यात मीठ, थोडेसे तिखट (व असल्यास १,२ आमसुले घालावी) .

थोडे उकळून त्यावर  हरभरा डाळीचे पीठ हाताने भुरभुरावे , दुसऱ्या हाताने ढवळत राहावे .

अधूनमधून ढवळून उकळी आणावी.

शिजत आल्यावर कोथिंबीर चिरून घालावी.

पालकाची पातळभाजी – Palak patalbhaji

साहित्य

पालक ,दाणे , हरभरा डाळीचे पीठ , ताक, लाल मिरची .

कृति 

पालक व दाणे कुकरमध्ये शिजवून घ्यावे.

बाहेर काढल्यावर जरा घोटून घ्यावे , त्यात हरभरा डाळीचे पीठ व ताक घालून नीट कालवावे.

फोडणी करून त्यात आवडत असल्यास लाल मिरचीचे तुकडे घालणे,

त्यानंतर त्यात वरील मिश्रण ओतावे व उकळवावे.

यात हवेतर थोडे आले किसून घालावे.

साधी आमटी – Sadhi Aamti

साहित्य

तुरीची डाळ , कढीलिंब , मिरच्या , कोथिंबीर .

कृति 

कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेणे.शिजवताना थोडी हळद घालणे.

गरम तेलावर मोहोरी, हिंग, हळद, कढीलिंब ,मिरच्या व त्यानंतर वरण घालणे.

शेवटी कोथिंबीर घालणे.

 

यात बदल म्हणून

१.    जिरे व कांदा ,टोमॅटो, आले  घातलेलेही छान लागते.

२.   कधी हवीतर लसूण घालावी.